रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या शिरपेचात मानाचा तुरा
पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार्या 2018-19 वर्षांसाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात राजू कोळी यालाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अवघ्या 20व्या वर्षी प्रभात कोळीने जगातील सात आव्हानात्मक समुद्रांपैकी सहा समुद्र पोहून पार केले आहेत. त्यातील कैवी आणि सुगारू चॅनल पोहताना त्याने तरुण आणि वेगवान जलतरणपटू म्हणून स्वतःचा ठसा उमटविला. नॉर्थ चॅनल पोहोणारा तो जगातील सर्वात लहान आणि आशियातील वेगवान जलतरणपटू ठरला आहे. आता सात समुद्र ओलांडण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला कूकची सामुद्रधुनी पार करायची आहे. त्याकरिता तो सध्या न्यूझीलंडमध्ये आहे.
अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, आशियातील जवळपास सगळे प्रमुख समुद्र आणि सामुद्रधुनी पोहून जाणार्या प्रभात कोळीच्या या कामगिरीची दखल गेल्या वर्षी केंद्र सरकारने घेतली. त्याला राष्ट्रीय क्रीडादिनी तेन्झिंग नॉर्गे हा साहसी खेळासाठी दिला जाणारा पुरस्कार देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. आता त्याला राज्य शासन सन्मानित करणार आहे.
प्रभातला त्याच्या वाटचालीत आई-वडिलांनी मोलाची साथ दिलेली आहे. त्याचे वडील राजू कोळी हे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आजीवन सदस्य आहेत, तर प्रभात या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सराव, तसेच व्यायाम करतो. त्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी प्रोत्साहन देऊन सहकार्य केलेले आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता गेट वे ऑफ इंडिया परिसरात होणार आहे. या वेळी सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेत
चमकदार कामगिरी करणार्या राज्यातील खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.