Breaking News

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने प्रा. एन. डी. पाटील यांना ‘स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार’ जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकर्‍यांचे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 29) करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 20) खांदा कॉलनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  

याबाबत अधिक माहिती देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच देण्यात येणार्‍या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या वेळी विशेष अतिथी म्हणून उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, तसेच रयतचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगतसाहेबांचे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण कायम राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्तरावर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कार्य करणार्‍या व्यक्तीला किंवा संस्थेला भगतसाहेबांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान करण्याची घोषणा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीत यंदापासून गुणीजन व्यक्ती किंवा संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली. समितीत रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांचा समावेश असून समितीने सखोल चर्चा करून घेतलेल्या निर्णयानुसार थोर विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना संस्थेच्या वतीने हा पहिला पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

1963-64 साली स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या नेतृत्वात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर गव्हाण येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाची स्थापना झाली आणि शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याचबरोबर संस्थेच्या जासई, फुंडे, नावडे, वावंजे या ठिकाणीही विद्यालये सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्व. दि. बा. पाटील, दत्तूशेठ पाटील यांच्या समवेत पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या स्थापनेतही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तळागाळातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाने मोठे व्हावे यासाठी स्व. जनार्दन भगतसाहेब, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी अविरत कष्ट घेतले व त्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक तत्त्वांचा प्रसार त्यांनी सातत्याने केला. त्यामुळे संस्थने मोठी उभारी घेत नावलौकिक प्राप्त केला. कर्मवीर अण्णा व प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्यप्रेरणेतून आणि जनार्दन भगत साहेबांच्या आशीर्वादाने 1 जानेवारी 1992 रोजी पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आज ही संस्था केजी ते पीएचडी असे विविध कोर्सेस असलेली व दर्जेदार भौतिक सुविधा, उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण असलेली संस्था म्हणून नावारूपास आली. संस्थेच्या वाटचालीत प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून महाराष्ट्रभर शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी केल्याबद्दल त्यांचा स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. स्व. जनार्दन भगत यांची जयंती दर चार वर्षांनी येते. त्या अनुषंगाने दर चार वर्षांनी भगतसाहेबांच्या जयंतीला राज्य स्तरावर सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती किंवा संस्थेला भगतसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

‘सीकेटी’त झालेल्या पत्रकार परिषदेस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संचालक संजय भगत, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः विशेष लक्ष देत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांसह संचालक मंडळ व सहकारी विशेष मेहनत घेत असल्याची माहिती प्राचार्य वसंत बर्‍हाटे यांनी दिली.

सोपे रस्ते चालायला सुरळीत असले तरी जिथे तुम्हाला जायचे तिकडे नेतीलच असे नाही. मळलेल्या वाटेने कुणीही जातो, पण न मळलेल्या वाटेवरून चालणाराच स्वतःचा मार्ग तयार करतो, ही शिकवण प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रुजवली. यातून अनेक आदर्श त्यांनी घडविले आहेत. प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व आहेत. त्यांनी स्वतःचा विचार न करता दुसर्‍यांसाठी नेहमीच पुढाकार घेतला. एक लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची ओळख कायम आहे. पाच वेळा आमदार राहूनही त्यांनी डोक्यात कधीही हवा जाऊ दिली नाही. शिक्षण क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अफाट व आदर्शवत आहे. त्यांच्या कार्याला कोणतीच तोड नाही. त्यामुळे त्यांना जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या वतीने पहिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्यामुळे या पुरस्काराचा लौकिकही वाढेल.  – लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply