अलिबाग : प्रतिनिधी
येथील कुलाबा किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष किल्ला संवर्धनाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. मराठा आरमाराचे उत्तर कोकणातील मुख्यालय असणार्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची पूर्व आणि पश्चिम दिशेकडील तटबंदी समुद्राच्या लाटांमुळे ढासळत आहे. त्यामुळे गणेश मंदिरासमोरील दीपस्तंभही पडण्याची शक्यता आहे. किल्ल्यातील वाड्यांचे अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर असून, किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. या किल्ल्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमी संघटना आणि अलिबागकरांकडून केली जात होती. त्यास मान्यता मिळाली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले की, डिसेंबर 2020मध्ये मी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांची भेट घेतली व त्यांना किल्ल्याच्या परिस्थितीबाबत अवगत केले. किल्ल्याचे संवर्धन आणि जतन तातडीने करणे आवश्यक असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही बाब लक्षात घेऊन किल्ल्याच्या संवर्धनासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी दिली होती. त्यानुसार कार्यवाहीस मंजुरी मिळाली आहे. तसे पत्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाने आपल्याला पाठविले आहे.