उरण ः रामप्रहर वृत्त
उरणमध्ये वास्तव्यास असणारी मूळची अलिबाग शहाबाज येथील नऊ वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर समुद्राच्या लाटांवर स्वार होत नवनवीन पराक्रम करीत आहे. रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमी अंतर पोहून पार केल्यानंतर तिने घारापुरी (एलिफंटा) ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किमी अंतर निर्धारित उद्दिष्टापेक्षा कमी वेळेत यशस्वीपणे पार केले. याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
समुद्राचे पाणी म्हटले की भल्या-भल्यांना भीती वाटते, पण याच सागराचे, लाटांचे रुद्राक्षी टेमकरला आकर्षण आहे. जेएनपीटीच्या आयईएस शाळेत चौथ्या इयत्तेमध्ये शिकणार्या रुद्राक्षीने अवघ्या दीड महिन्याच्या अंतरामध्ये रेवस ते गेट वे ऑफ इंडिया आणि यानंतर आता घारापुरी (एलिफंटा) ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार केले आहे. समुद्री प्रवाह, उंच लाटा, मोठ-मोठी जहाज यामधून मार्ग काढत रूद्राक्षीने 26 मिनिटे आधी आपले ध्येय पूर्ण केले. धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटरचे अंतर पोहून जाण्याचे तिचे पुढील लक्ष्य आहे.
रूद्राक्षी या यशाचे श्रेय ती आपले प्रशिक्षक हितेश भोईर यांना देते. आर्यन मोडखरकर, ओमकार कोळी, प्रिया गुप्ता आणि आर्य पाटील यांचीही तिला साथ लाभली. रुद्राक्षीने हे यश आपल्या देशाच्या वीर जवानांना अर्पण करीत असल्याचे म्हटले आहे, तर रुद्राक्षीच्या आई-वडिलांनी मुलीने केलेल्या पराक्रमाबाबत आनंद व्यक्त करताना सांगितले की, रुद्राक्षी अभ्यासातही हुशार असून, वाचन, चित्रकला, गायन यासारख्या कलांमध्ये पारंगत आहे. तिला शाळेतूनही अधिक प्रोत्साहन मिळत असते.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …