Breaking News

टीम इंडियाचे टेन्शन वाढले

न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एका तगडा गोलंदाज

ऑकलंड : वृत्तसंस्था
पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटाने टीम इंडियाची दाणादाण उडवली. त्यातच भारतीय संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एक जलदगती गोलंदाज दाखल झाला आहे आणि त्याच्या भेदक मार्‍यासमोर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांनीही नांग्या टाकल्या होत्या. त्यामुळे मालिका वाचवण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार्‍या टीम इंडियासमोर तगडे आव्हान असणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीने दोन्ही डावांत मिळून नऊ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला पदार्पणवीर जेमिसन (4) आणि बोल्ट (5) यांची चांगली साथ लाभली होती. भारताला दोन डावांत अनुक्रमे 165 आणि 191 धावाच करता आल्या. अशातच दुसर्‍या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघात नील वॅगनरचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॅगनरने त्याच्या भेदक व आखूड मार्‍याने वर्चस्व गाजवले होते. आता तो टीम इंडियाच्या फलंदाजांना सतावण्यासाठी सज्ज झाला आहे. पितृत्व रजेवर असल्यामुळे वॅगनरला पहिल्या कसोटीत खेळता आले नव्हते. मॅट हेन्रीच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या समावेशामुळे न्यूझीलंड संघासमोर पेच निर्माण झाला आहे. पदार्पणात धमाका उडवणारा जेमिसन किंवा वॅगनर अशा निवडीचा पेच कर्णधार केन विलियम्सनसमोर उभा राहिला आहे.
बचावात्मक पवित्र्यातून बाहेर या : विराट कोहली
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टिकोनातून न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात बाजी मारणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे बनले आहे. या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. माझ्या मते आमच्या फलंदाजीतील देहबोली सुधारण्याची गरज आहे. बचावात्मक पवित्रा घेतल्यामुळे तुम्हाला धावा करता येतील असे मला वाटत नाही. जर तुमच्याकडून एकेरी-दुहेरी धावाही येत नसतील, तर अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःवरच शंका घ्यायला लागता. याचसोबत तुमच्या साथीदारावरही धावा होत नसल्यामुळे दडपण येते, ज्यामुळे एखादा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट फेकली जाते. या बचावात्मक पवित्र्यामधून फलंदाजांनी आता बाहेर यायला हवे, असे दुसर्‍या कसोटी सामन्याआधी पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply