Breaking News

भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जानेवारीला काम बंद आंदोलन

कोरोना प्रादूर्भावामुळे 13 जानेवारीची भूमिपुत्र परिषद होणार मर्यादित स्वरूपात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
13 जानेवारी रोजी होणारी भूमिपुत्र परिषद वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय कृती समितीद्वारे जाहीर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना समितीतर्फे सांगण्यात आले की, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आणि पोलीस प्रशासन यांची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, जे. डी. तांडेल, गुलाब वझे, संतोष केणे, रूपेश धुमाळ, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विमानतळबाधित 27 गावांवर होणार्‍या सिडकोच्या अन्यायाबाबत कृती समितीने चर्चा केली. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे आंदोलन करू नये अशा सूचना व आवाहन या बैठकीत पोलीस प्रशासनाने कृती समितीला केले, तसेच पोलिसांनी या प्रश्नासंबंधी सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर 20 जानेवारीपूर्वी बैठक घेण्याचे आश्वासित केले.
या वेळी कृती समितीने सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर भूमिपुत्रांच्या बाबतीत प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करणार असल्याचे पोलीस प्रशासनाला सांगितले.
13 जानेवारीला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंती दिनी कोल्ही कोपर येथे होणारी भूमिपुत्रांची निर्धार परिषद कोविडचा प्रोटोकॉल पाळून मर्यादित स्वरूपात घेण्याचे कृती समितीने जाहीर केले. या परिषदेला पनवेल, उरण विभागातील प्रमुख कार्यकर्ते व विमानतळबाधित 27 गावचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे कृती समितीतर्फे कार्याध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले.
कोरोनाच्या मोठ्या स्वरूपाच्या लाटेमुळे परिषदेचे स्वरूप बदलण्यात आले असले तरी 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळेला ‘दिबां’ची जयंती आपापल्या गावांमध्ये, विभागांमध्ये साजरी होईल. त्यानंतर प्रमुख कार्यकर्ते कोल्ही कोपर येथे येतील असे ठरले आहे, तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर होणार्‍या बैठकीत भूमिपुत्रांच्या बाबतीत प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply