मुरुड : प्रतिनिधी
प्रवाशी संघटना व राजपुरी ग्रामपंचायत यांच्या मागणीनुसार येत्या रविवार (1मार्च) पासून राजपुरी – मुंबई बससेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे मुरुड आगर व्यवस्थापक सनील वाकचौरे यांनी बुधवारी जाहीर केले.
मुरुडहुन पहाटे 5 वाजता सुटणारी डोंगरी (दर्शना) मार्गे मुंबई ही एसटी बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे राजपुरी, डोंगरी, मुरुड येथील प्रवाशांचे हाल होत होते. ही बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशी संघटना व राजपुरी ग्रामपंचायतीने केली होती. त्याची दखल घेत मुरुड आगर व्यवस्थापक सनील वाकचौरे यांनी रविवारपासून राजपुरी – मुंबई बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी राजपुरी सरपंच हिरकणी गिदी, माजी सरपंच लियाकत कासकर यांच्यासह राजपुरी ग्रामस्थ उपस्थित होते
ही जलद गाडी राजपुरीहून पहाटे 4.30 वाजता निघेल. डोंगरी हनुमान मंदिरवरून एकदरा, कल्याणी नाका, लक्ष्मीखार, दत्तवाडी, अलिबाग, पेण, पनवेलमार्गे मुंबईला जाईल. व 11.30 मुंबई येथून परतीच्या प्रवासाला निघेल.