Breaking News

पनवेल महापालिकेच्या कामावर सफाई कर्मचारी आयोग समाधानी

पनवेल : बातमीदार

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग पनवेल महानगरपालिकेच्या कामावर समाधानी असल्याचे  मत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनु सारवान व त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेल महापालिका मुख्यालयास भेट देऊन महापालिकेत कार्यरत असणार्‍या स्थायी व कंत्राटी सफाई कामगारांच्या समस्याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला, त्यावेळी अध्यक्ष मुकेश सारवान बोलत होते. पनवेल महानगरपालिकेने सफाई कर्मचार्‍यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जे निर्णय घेतले आहेत ते उल्लेखनीय आहेत. या महानगरपालिकेप्रमाणे राज्यातील इतर महापालिकांनी सफाई कर्मचार्‍यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख हे तत्काळ निर्णय घेत असल्यामुळे आयोग पूर्णपणे समाधानी आहे. सर्व सफाई कर्मचारी संघटनेने त्यांचे प्रश्न आयोगाकडे लेखी स्वरुपात द्यावेत. त्याचा शासनाकडे पाठपूरावा स्वत: आयोग करील व त्यांना न्याय मिळवून देईल, असेही अध्यक्षांनी या वेळी स्पष्ट केले. पनवेल शहराची स्वच्छता करणारा सफाई कामगार हा पनवेल महानगरपालिकेच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी महापालिका प्रशासन कटीबद्ध आहे, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सफाई कर्मचारी आयोगाशी चर्चा करताना सांगितले. या वेळी उपआयुक्त जमीर लेंगरेकर, उपआयुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी, आयोगाचे प्रतिनिधी एफ. बी. चावरीया, सूर्यप्रकाश सोळंके, वरीष्ठ अधिकारी तसेच श्रमिक संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील, पनवेल महापालिका सफाई कर्मचारी संघटनेचे सचिव चंडालिया व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्ताने सफाई महिला कर्मचार्‍यांचा आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनु सारवान यांच्या हस्ते सत्कार केला. तसेच सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने मुकेशजी सोनु सारवान व महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.

सफाई कामगारांच्या वेतनातून दरमहा 30 रूपये कपात करुन त्यांना त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर 10 लाख रुपयांची विमा रक्कम मिळवून दिली जाते. अशाप्रकारे आतापर्यंत दोन सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखप्रमाणे एकूण 20 लाख रूपयांचा लाभ मिळवून दिला आहे. अशी मदत मिळवून देणारी पनवेल महानगरपालिका ही देशातील पहिलीच महापालिका असावी. सफाई कामगारांच्या आरोग्याची वेळोवेळी मोफत तपासणी कॅशलेस व्हावी, या दृष्टीने महापालिकेचा प्रयत्न सुरू आहेत.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply