पनवेल : रामप्रहर वृत्त
विरूपाक्ष देवस्थानच्या वतीने पनवेल येथे स्वरशंकरा या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक केदार केळकर व नेहा पुरोहित यांंचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन झाले. पं. अरुण कशाळकर व मंदार भिडे यांच्याकडे गायनाचे धडे घेणार्या नेहा पुरोहित हिने देव देव महादेव महेश्वर या यमनकल्याण रागातील बंदिशीने मैफिलीचा प्रारंभ केला. त्यानंतर अबीर गुलाल, जोहार मायबाप, खरा तो प्रेमा आदी गाणी सादर करून रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. पं. सुहास व्यास यांचा शिष्य असलेल्या केदार केळकर यांनी राग बिहाग सादर करून नंतर विविध नाट्यपदे सादर केली. अथर्व देव यांनी संवादिनी, गणेश घाणेकर यांनी तबला, किरण भोईर यांनी पखवाज व आदित्य उपाध्ये यांनी तालवाद्य साथ केली. किरण बापट यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. विरुपाक्ष मंदिराचे विश्वस्त नंदूसाहेब पटवर्धन, संदीप लोंढे, महेंद्र गोडबोले, चंद्रकांत मने, किरण गोखले आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.