नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदू घरत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि. 27) मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते ग्रंथदिंडीच्या पूजनाने सुरूवात झाली. तसेच या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा अरूण घरत, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, उच्च माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका अनुराधा कोल्हे, पर्यवेक्षक अजित सोनवणे व प्रशांत मोरे, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन, इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते. राजभाषा दिनानिमित्त विद्यालयात ग्रंथदिंडी, लेझीम पथक, मराठी भाषा महत्वपर घोषणा, गीते, भाषण या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदू घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मराठी मायबोलीचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. विविध भाषा बोलणार्या प्रत्येकाला मराठी भाषेचे महत्व पटले पाहिजे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी मायबोलीचे महत्व पटवून दिले व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.