Breaking News

अमली पदार्थाची विक्री करणार्या नायजेरियन नागरिकाला अटक

पनवेल : वार्ताहर

खारघर सेक्टर 32मध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकाला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने रविवारी दोन किमी पाठलाग करून पकडले.

केनिथ इझी (वय 32) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून नार्कोटिक्स ब्युराने त्याच्याजवळ असलेले सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाच मेफेड्रोन हे अमली पदार्थ जफ्त केले आहे. केनिथ इझी हा अमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार असून त्याला यापूर्वीदेखील एनसीबीने अटक केली होती. 

खारघर सेक्टर 32 भागात एक नायजेरीयन व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोला मिळाली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने खारघर येथे त्याच्यावर पाळत ठेवली होती. या वेळी केनिथ इझी याला एनसीबीच्या पथक आपल्या मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने त्याच भागातील जंगलात पलायन केले. या वेळी एनसीबीच्या पथकाने नायजेरीयन नागरिक केनिथ इझी याचा जंगलामध्ये दोन किमी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 200 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हे अमली पदार्थ आढळून आले. 

आंतरराष्ट्रीय बाजारात 200 ग्रॅम वजनाच्या मेफेड्रॉनचा दर सुमारे 20 लाख रुपये असल्याची माहिती मुंबई एनसीबीच्या वेस्ट झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली. या कारवाईत पकडण्यात आलेला केनिथ इझी हा अमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार असून तो मुंबई तसेच नवी मुंबईत अमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले, तसेच त्याला यापुर्वीदेखील अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केनिथ इझी याला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोने एनडीपीएस कलमाखाली अटक करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply