Breaking News

कर्जतमध्ये लाखोंचा गांजा जप्त

दोन जणांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील पळसदरी परिसरातून साडे पंधरा किलो गांजा आणि त्याची वाहतूक करणारी गाडी असा सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांना  अटक केली आहे. कर्जत शहरातून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक निरीक्षक एस. एस. पोमण, हवालदार सुभाष पाटील, महेश पाटील, हनुमंत सूर्यवंशी, स्वप्नील येरूणकर, प्रशांत देशमुख यांनी कर्जत-पळसदरी रस्त्यावरील हॉटेल कर्जत किंग रेस्टॉरंट समोरील रस्त्यावर सापळा लावला होता. त्यावेळी संशयित पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर (एमएच-46, बीके 1519) अडवून पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीमधील काळ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले. 15 किलो 500 ग्रॅम वजनाच्या या गांजाची किंमत एक लाख 86 हजार रुपये आहे. पोलिसांनी गाडीतील अवदेश चंद्रशेखर वर्मा (वय 31, रा. कर्जत महावीर पेठ) आणि मुन्नीलाल ललकारी राजभर (वय 25, सध्या रा. मुद्रे कर्जत) यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने 29 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा व त्याची वाहतूक करणारी गाडी मिळून एकूण नऊ लाख 86 हजार ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पोमण करीत आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply