Breaking News

मेट्रोकरिता सिडकोला पैसे देण्यास प्रशासनाचा नकार

  • पनवेल मनपाच्या महासभेत निर्णय
  • सर्वपक्षीय सदस्यांचाही पाठिंबा

पनवेल ः प्रतिनिधी
सिडकोमार्फत सुरू असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाकरिता पनवेल महापालिकेमार्फत कोणताही सहभाग दिला जाऊ नये, असा निर्णय पालिकेच्या गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आलेल्या महासभेत घेण्यात आला. या वेळी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी अडिवली येथील जागा घेण्यासही मंजुरी देण्यात आली.
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी 11 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाइन घेण्यात आली. या वेळी मेट्रो प्रकल्पाकरिता सिडकोनेच पैसे द्यावेत अशी भूमिका घेत आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही पैसे देण्यास विरोध दर्शविल्याने सिडकोने प्रथम पनवेल महापालिकेकडून नवी मुंबई विमानतळासाठी हस्तांतरित करून घेतलेल्या 35 एकर जागेचा मोबदला द्यावा, अशी मागणी करतानाच सिडकोच्या मालकीच्या जागा पालिकेला देताना सिडकोमार्फत पैसे मागितले जात असल्याने सिडकोने प्रथम पालिकेकडून घेतलेल्या जागेचा मोबदला द्यावा आणि नंतरच पनवेल पालिकेकडून पैशांची मागणी करावी, अशी भूमिका सर्वपक्षीय सदस्यांनी घेतल्याने हा ठराव बारगळला.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्प कॉरिडॉर 1वरील पनवेल पालिका हद्दीत करण्यात येणार असलेल्या लाइन 2 व लाइन 3च्या कामाकरिता स्थानिक प्राधिकरणाच्या नियमानुसार पनवेल पालिकेनेही आपला सहभाग द्यावा, अशी मागणी सिडकोमार्फत करण्यात आली आहे. सिडकोने केलेल्या मागणीनुसार 2024मध्ये पूर्ण करण्यात येणार असलेल्या या मेट्रो प्रकल्पाला अंदाजे 4426 कोटींचा खर्च येणार असल्याने पनवेल पालिकेनेदेखील स्थानिक प्राधिकरण अधिनियमानुसार खर्चाची 4.52 टक्के म्हणजेच जवळपास 200 कोटींची रक्कम प्रकल्पाकरिता द्यावी, अशी मागणी केल्याने गुरुवारी झालेल्या महासभेत सर्वानुमते या मागणीला विरोध दर्शविण्यात आला.
पालिका हद्दीत निर्माण होणार्‍या घनकचर्‍याचे व्यवस्थापन करण्याकामी पालिकेच्या मालकीचे घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याकरिता प्रभाग 1मधील अडिवली परिसरात असलेली शासनाची जागा उपलब्ध व्हावी यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. पालिका हद्दीत निर्माण होत असलेल्या घनकचर्‍याचे विघटन करण्याकरिता पालिकेला सिडकोतर्फे तळोजा येथे चालवण्यात येत असलेल्या क्षेपणभूमीवर अवलंबून राहावे लागते. सिडकोच्या या क्षेपणभूमीची क्षमताही येत्या काही वर्षांत संपुष्टात येणार असल्याने पालिकेचे स्वतःचे कचर्‍यावर प्रक्रिया केंद्र असावे याकरिता प्रयत्न करणार्‍या पालिका प्रशासनातर्फे प्रभाग क्रमांक 1 येथील अडिवली परिसरात असलेल्या शासनाच्या सर्व्हे क्रमांक 89 अ या जागेची मागणी करणारा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सभागृहाच्या मान्यतेकरिता सभागृहासमोर ठेवण्यात आलेल्या या ठरावास मान्यता देण्यात आली आहे.

पनवेल पालिकेची स्थापना नव्याने झाली असल्याने प्रकल्पाकरिता लागणारी रक्कम देणे पालिकेला शक्य होणार नाही. प्रकल्पाकरिता लागणारी रक्कम सिडकोनेच भरणे अपेक्षित आहे.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल मनपा

पनवेल पालिका हद्दीत असलेल्या भूभागापैकी बराच मोठा भाग सिडकोने विकसित केला असल्याने प्रकल्पाकरिता लागणारी रक्कम सिडकोने भरावी, अशी विनंती सिडकोकडे करण्यात येईल.  
-सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल मनपा

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply