Breaking News

म्हसळ्यात सीएए व एनआरसी समर्थनार्थ रॅली

म्हसळा : प्रतिनिधी

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. 27)म्हसळा शहरात हिंदू संघटनांतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  विविध राजकीय पक्षांचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. केंद्र शासनाने पारित केलेल्या या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. सीएए व एनआरसी या दोन्ही कायद्यांच्या समर्थनासाठी गुरुवारी येथील हिंदू संघटनांनी म्हसळा एसटी स्टँड ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. या वेळी सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनाबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यासाठी तहसीलदारांकडे देण्यात आले.  त्यानंतर श्री धावीर देव पटांगणात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उमेश गायकवाड यांनी मुस्लिम धर्मियांचा देशद्रोही प्रचार व अफझलला समर्थन करण्याच्या धोरणावर ताशेरे ओढताना संविधान बचावचे खोटे नारे देणार्‍यांचे वाभाडे काढले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे, हिंदू संघटनेचे अध्यक्ष महादेवराव पाटील, सुभाष उर्फ बाळ करडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर आदींचीही दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ भाषणे झाली. या सभेला कोणतेही साधन न पुरवता तालुक्यातून किमान तीन ते चार हजार समर्थक उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या दोन्ही कायद्यांचे जाहीर समर्थन

सीएए कायदा कोणत्याही जातीधर्माला विरोध करणारा नाही. सीएए व एनआरसी कायदे सर्व भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने केंद्र शासनाने या दोन्ही कायद्यांची संपूर्ण देशात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, यासाठी आम्ही या कायद्याला पाठिंबा दर्शवित आहोत. तसेच या कायद्याने घुसखोरांना देशाबाहेर काढणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेश या देशांतील अल्पसंख्याक (गैर मुस्लिम) हिंदू, शीख, पारशी व जैन नागरिकांना आपल्या देशात नागरिकत्व देता येणे शक्य होणार असल्याने आम्ही म्हसळा तालुक्यातील तमाम हिंदू समाज बांधव केंद्र शासनाच्या या दोन्ही कायद्यांचे जाहीर समर्थन करीत आहोत, असे हिंदू संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

चोख पोलीस बंदोबस्त

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, सात निरीक्षक, 25 सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, आरसीपीच्या तीन तुकड्या, स्टाइकींग फोर्सच्या दोन तुकड्या, 200 पोलीस कर्मचारी व 50 राखीव कर्मचारी रॅलीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा शहरात तैनात करण्यात आले होते. शहरातील वाहतूक व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply