मुरूड : प्रतिनिधी
महावितरण कंपनीने कंत्राटी कामगारांना तातडीने संरक्षक प्रावरणे द्यावीत, अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे मुरुड तालुका माजी उपाध्यक्ष महेश मानकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन महावितरण कंपनीचे मुरूड येथील उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांना देण्यात आले. या वेळी भाजप शहर अध्यक्ष उमेश माळी, तालुका उपाध्यक्ष बाळा भगत उपस्थित होते. तालुक्यातील वीज व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी महावितरणच्या मुरुड कार्यालया तर्फे अनेक युवकांना कंत्राटी कामगार म्हणून घेण्यात आले आहे. हे कंत्राटी कामगार उत्कृष्ठ सेवा देत असतात. मात्र त्यांना कंपनीकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही. खांबावर चढून जीवंत वीज वाहिन्यांचे काम करताना रबरी हॅन्डग्लोज व बूट व अन्य आवश्यक सुरक्षा साहित्य पुरविणे आवश्यक असतानासुद्धा या कंत्राटी कामगारांना कोणतेही साहित्य पुरविले जात नाही. त्यामुळे विजेचा धक्का लागून हे कंत्राटी कामगार खांबावरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अभिषेक वर्तक हा कंत्राटी कामगार तालुक्यातील उंडरगाव येथे खांबावर चढून काम करताना खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तो सध्या घरीच उपचार घेत आहे. उसरोली व अन्य भागात अशाच घटनामध्ये गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगारांचीही महावितरणने काळजी घेतलेली नाही. या जखमी कामगारांना संरक्षण देवून महावितरण कंपनीने त्यांचा वैद्यकीय खर्च उचलावा, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे.