अलिबाग : प्रतिनिधी
शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात याव्यात, यासह राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 27) मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक परिषदेतर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन
करण्यात आले.
संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, संघटनमंत्री भगवानराव साळुंखे, महिला आघाडीप्रमुख पूजा चौधरी, कार्यालयमंत्री सुनील पंडित, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, शिक्षण परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्याध्यक्ष मधुकरराव उन्हाळे, राज्य कार्यवाह सुधाकर मस्के, संघटन मंत्री सुरेश दंडवते यांनी या आंदोलनाचे
नेतृत्व केले.
1 नोव्हेंबर 2005नंतर सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, डीसीपीएस धारकांच्या मयत कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची तातडीने मदत करावी व फॅमिली पेन्शन योजना लागू करण्यात यावी, शिक्षकांना बीएलओ व जनगणनेची कामे दिली जाऊ नयेत, मान्यताप्राप्त शिक्षकांना टीईटी अट रद्द करणे, अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षक नियुक्त करण्यात यावेत, यापूर्वीची 12 व 24 वर्षाला मिळणारी चट्टोपाध्याय व निवड श्रेणी रद्द करून 10, 20, 30 वर्षे सेवेनंतर सरसकट विनाअट सर्वांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, बाल संगोपन रजेसंदर्भात शिक्षण विभागाचा शासन निर्णय त्वरित काढावा, जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करणे, परंतु बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच झाल्या पाहिजेत, प्राथमिक शाळेला पटसंख्येची अट न ठेवता मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या.