मुरुड : प्रतिनिधी
जानेवारीतील मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूड तालुक्यातील गरीब व मध्यमवर्गीयांची ससेहोलपट होत आहे. फेब्रुवारी महिना संपला तरीही जानेवारी महिन्याचा रॉकेल टँकर मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातील रॉकेल टँकर कोणी पळवून नेला याची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मुरूड तालुक्यात दोन गॅस सिलिंडर असणार्यांची संख्या कमी आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात राहणार्यांची व पिवळे रेशनकार्डधारकांची संख्या जास्त आहे. दोन गॅस सिलिंडर असणार्यांना रॉकेल दिले जात नाही, मात्र एक सिलिंडर व पिवळे रेशनकार्ड असणार्यांना रॉकेलची गरज भासते. मुरूड तालुक्यासाठी पूर्वी दर महिन्याला तीन टँकर्स रॉकेल पुरवण्यात येत होते, मात्र आता महिन्याला एकच टँकर रॉकेल मिळत आहे. मुरूड तालुक्याला जानेवारी महिन्यातील 11 हजार लिटर रॉकेलचा टँकर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रॉकेल वापरणार्या गरीब व मध्यमवर्गीयांची ससेहोलपट झाली. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातील रॉकेल टँकर उपलब्ध झाल्याने जानेवारीतील रॉकेल चोरीला गेल्याची चर्चा सध्या मुरूड तालुक्यात सुरू आहे.
कंपनीकडून उपलब्ध न झाल्याने मुरूड तालुक्याचा जानेवारी महिन्यातील रॉकेल टँकर आला नाही. तसे वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आले आहे.
-सविता खोत, पुरवठा अधिकारी, मुरूड