म्हसळा : प्रतिनिधी
शहरातील एका शाळकरी मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री घडली. या प्रकरणी एका मुस्लिम तरुणावर म्हसळा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात रात्रभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवार रात्री 8.15 वाजता शादाब वस्ता या तरुणाने शहरातील एक शाळकरी मुलीचा मोटरसायकलवरुन पाठलाग केला. जवळपास कोणी नसल्याचा फायदा घेत तिचा हात पकडून मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. याआधीदेखील हा तरुण पीडित मुलीला मोटारसायकलवरुन कट मारणे, पाठलाग करणे असे कृत्य करीत होता. या प्रकरणी शादाब वस्ता याच्यावर म्हसळा पोलीस ठाण्यात भादवि कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 प्रमाणे (पोस्को अंतर्गत) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस सबइन्स्पेक्टर शेलार या करीत आहेत.
म्हसळा शहरात शाळकरी मुली, महिला यांच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ होत आहे. शहर व तालुक्यातील महिला सुरक्षीत असणे, पोलिसांची जबाबदारी आहे. म्हसळ्यात दामिनी पथक कार्यरत करणे, ही काळाची गरज आहे.
-रेखा धारिया, सदस्या, महिला दक्षता समिती, म्हसळा