मोहोपाडा : प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा ही 17 सदस्य असणारी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांचा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. एकूण 27 जण या दौर्यात सामील झाले होते. या वेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने गावासोबत पाटोदा ग्रामपंचायत पाहून यावी, असे आवाहन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी केले आहे. गावचा विकास हा शासनावर अवलंबून न राहता मुख्यता नागरिकांच्या सहकार्यानेच होतो असे स्पष्टपणे पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी सांगितल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी सांगितले. या वेळी पाटोदाची उत्कृष्ट शाळा व आदर्श ग्रामपंचायतीची माहिती घेत पाटोदा आदर्श ग्रामपंचायतीचा शिस्तबद्ध कारभार पाहून ग्रामपंचायत प्रमुख व शालेय शिक्षकांसोबत खुला संवाद साधला. शासकीय योजनेपेक्षा गावाला काय हवे, कसली गरज आहे, कुणाचे सहकार्य घ्यावे हे महत्वाचे आहे. स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी, भुयारी गटारे, स्वच्छता व एप्रिलमध्येच 100% कर वसुली यावर आपला भर असेल असे त्यांनी सांगून ग्रामसभेला पूर्ण उपस्थितीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी केले. या अभ्यासदौर्यात राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमा मुंढे, सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य संदिप मुंढे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कृष्णा पारंगे, माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य दत्ता शिंद, सर्व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते.