Breaking News

भीती नको पण काळजी घ्या

भारतात लोकसंख्येची घनता दाट असल्यामुळे कुठल्याही संसर्गजन्य रोगाची लागण फार चटकन होते. तसेच सार्वजनिक आरोग्याबाबत आपल्याकडे एक प्रकारची उदासिनता दिसते, ती टाळावयास हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न करून अत्यंत आग्रहाने देशपातळीवर स्वच्छता अभियान राबवले. तब्बल दहा कोटींहून अधिक शौचालये बांधली. त्याचे महत्त्व आता तरी विरोधकांना पटेल का?

चीनमधील वुहानमधल्या मटण मार्केटात उद्भवलेल्या कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. चीनी सरकारने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून या जीवघेण्या कोरोना व्हायरसला अटकाव करण्याचे शर्थीचे प्रयत्न केव्हाचेच सुरू केले आहेत. परंतु चीनी प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. जगभरात पन्नासहून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला असून तीन हजारांहून अधिक बळी गेले आहेत. या विषाणूमुळे आजारी पडलेल्यांची संख्या काही लाखांत आहे. कोरोना विषाणू हा नव्यानेच उद्भवलेला एक घातक विषाणू असल्याने त्याला नष्ट करण्यासाठी कुठलीही लस किंवा ठराविक उपचार उपलब्ध नाहीत. जगभरातील शेकडो शास्त्रज्ञ या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्यासाठी धडपडत आहेत. परंतु त्यांना अद्याप तरी यश मिळालेले दिसत नाही. चीन, जपान, उत्तर कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाने अक्षरश: हाहाकार उडवला असून या विषाणूपुढे विज्ञान आणि मानवी प्रयत्न कमी पडत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. कोरोना विषाणू अखेर भारतात देखील येऊन ठेपला असून हे वृत्त देखील काळजाची धडधड वाढवणारे आहे. भारतात आजमितीस किमान 28 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थान हा परदेशी पर्यटकांनी गजबजलेला मुलुख. त्यामुळे भारतातील पहिला कोरोनाचा रुग्ण राजस्थानातच सापडणार ही भीती अखेर खरी ठरली. इटलीहून आलेल्या 21 पर्यटकांपैकी 15 जणांना व त्याच्या बसच्या भारतीय ड्रायव्हरला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या अखत्यारीतील सुरक्षा तळावर नवी दिल्लीत वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाची लागण भारतीयांना होऊ नये यासाठी अशी दक्षता घेणे भागच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे संकट ओळखून वेळीच पावले उचलल्याने भारतातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज झाली आहे. या घटकेपर्यंत महाराष्ट्रात करोना विषाणूला शिरकाव मिळालेला नाही ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब. आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सज्ज असली तरी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी. कोरोना विषाणूला घाबरण्याचे कारण नाही. परंतु त्याचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेेणे आवश्यक आहे. हा विषाणू हवेतून फार लांबवर पसरू शकत नाही. तेव्हा दोन व्यक्तींनी एकमेकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किमान तीन फुटाचे अंतर ठेवावे. दीर्घकाळ असलेला खोकला दुर्लक्ष न करता डॉक्टरांकरवी तपासणी करून घ्यावी. दिवसातून तीन-चार वेळा साबणाने स्वच्छ हात धुवावेत. अंगावरचे कपडे स्वच्छ धुतलेलेच घालावेत. खोकला झालेला असल्यास विशिष्ट मास्क आवर्जून वापरावा.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांचा तुटवडा पडणार नाही याची काळजीही घेतली आहे. नागरिकांनी न घाबरता स्वच्छतेचे नियम पाळून करोना व्हायरस विरुद्धची ही लढाई जिंकायलाच हवी. जे चीनला जमले नाही, ते भारतातील 130 कोटी लोकांनी करून दाखवावे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply