Breaking News

पांडवकड्याचे सौंदर्यीकरण आणि विकास करावा; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त

खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून पांडवकड्याच्या विकासासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा केली.

‘पनवेल तालुक्यातील खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सौंदर्यीकरण व विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांकडे निवदेनाद्वारे केली आहे. पांडवकडा हा पावसाळी धबधब्यासाठी तसेच निसर्गरम्य वनराईसाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक तेथे भेट देत असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने व पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या स्थळाचे सुशोभीकरण व विकास केल्यास स्थानिक भूमिपुत्रांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार असल्याने याकरिता निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली,’ असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल करून त्यासंदर्भात विचारणा केली.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, नवी मुंबईतील खारघर येथील पांडवकडा धबधब्याच्या परिसरात पक्क्या स्वरूपाचा पोहच रस्ता नसल्याने धबधब्याजवळ जाण्याकरिता सुरक्षित पायवाट, रेलिंग, उपाहारगृह, प्रसाधनगृह, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. सबब सिडकोने या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्पनात्मक नकाशा तयार केला असून, त्यानुसार 1.5 किमी लांबीचा रस्ता, पार्किंग, शौचालय, लॉकर सुविधा, लाकडी मचाण आणि तात्पुरत्या स्वरूपाचे उपाहारगृह इत्यादी प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. परिसरातील पर्यटनस्थळ निर्मितीबरोबरच पांडवकडा धबधब्याचा विकास, सुरक्षा तसेच स्थानिक लोकांना यातून रोजगारही उपलब्ध होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आग्रही राहिले आहेत.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply