दोन महिने लष्करात सेवा बजावणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौर्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज यापुढे खेळणार का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. पुढील दोन महिन्यांसाठी धोनी या रेजिमेंटला वेळ देणार असल्याचे वृत्त आहे. आपण वेस्ट इंडिजला जाणार नसून पुढील दोन महिने रेजिमेंटसोबत घालवणार आहोत, असे धोनीने स्वत: सांगितल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकार्यानेही स्पष्ट केले आहे.
धोनी विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा सुरू होती, पण धोनीचा क्रिकेटमधून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे त्याचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी स्पष्ट केले आहे. क्रिकेट सोडण्याबाबत धोनीने कोणताही विचार केलेला नाही, असे ते म्हणाले. विश्वचषकातील संथ खेळानंतर धोनीने निवृत्ती घ्यावी, असे क्रिकेटप्रेमींचे म्हणणे होते; तर धोनी अजूनही चांगला खेळ करीत असून तो उत्तम फिनिशर आहे, असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘माही’ची निवृत्ती आणि आगामी वेस्ट इंडिज दौर्यासाठी त्याची संघात निवड होणार का, याबाबतची चर्चा क्रिकेटविश्वात सुरू होती, मात्र दोन महिने क्रिकेट खेळणार नसल्याचे सांगत धोनीने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.