पनवेल : वार्ताहर
अबोली रिक्षा चालक महिला संघटनेच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या आठ महिलांचा गौरव केला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, अभिनेते अरुण कदम उपस्थित होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, दै. वादळवाराचे संपादक विजय कडू, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे, पत्रकार संजय कदम, दिपक घोसाळकर, सुनील कटेकर, अनिल कुरघोडे आदी उपस्थित होते.
सोहळ्यात महाराष्ट्रातील पहिली महिला रिक्षा चालक शालिनी गुरव यांना सावित्रीबाई फुले स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात गेली 30 वर्षे सेवा देणार्या विमल रामचंद्र भगत यांना डॉ. आनंदीबाई जोशी स्मृती गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. शहरातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम करणार्या कल्पना कांबळे यांना संत गाडगेबाबा स्मृती गौरव पुरस्कार, भारतातील पहिली महिला रिक्षा चालक म्हणून ज्यांची गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डसमध्ये नोंद आहे अशा शिला डावरे यांना आंतराळवीर कल्पना चावला स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या गाण्यातून आगरी संस्कृती परंपरा जतन करणार्या गणीबाई म्हात्रे यांना स्वरसम्राज्ञी सरस्वतीबाई राणे स्मृती पुरस्कार बहाल करण्यात आला. तलवारबाजीमध्ये विशेष प्राविण्य प्रात्प असलेल्या तसेच सध्या वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या साधना पवार यांना इंदिरा गांधी स्मृती गौरव पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले. पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या तसेच अन्यायाला वाचा फोडणार्या सुरुचि शिदोरे यांना बाळकृष्ण जांभेकर स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पेण सारख्या शहरात आपला दुधाचा व्यवसाय सुरु करुन आपल्या कर्तबगारीने आपले साम्राज्य उभे करणार्या उद्योजक रंजना ठाकूर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. निवेदन सुमेधा निमन यांनी केले तर आभार संतोष सुतार यांनी मानले. संस्थेच्या उपाध्यक्षा सुलोचना भगत, शालिनी गुरव, खजिनदार ललिता राऊत, सहखजिनदार सुनिता जाधव, सेक्रेटरी विलास जाधव उपस्थित होत्या.