Breaking News

खोटे बोलणारे सरकार

चंद्रकांत पाटील यांची ‘मविआ’वर हल्लाबोल

पुणे : प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोटे बोलणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार, असा हल्लाबोल केला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ते या वेळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत 31 जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले होते, पण आता मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होत आहे.

खोटे बोलणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झाले की, वेळ मारून न्यायची एवढेच यांचे काम आहे. घोषणा करायची, मात्र काही अंमलबजावणी करायची नाही; याबाबत उत्तम उदाहरण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याच्याबाबत विधानसभेत करण्यात आलेली घोषणा. शब्द दिला पण तो शब्द पाळला नाही. प्रत्येक विषयावर थापा मारणार का?, असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.

पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेट्रोच्या चाचणीवरून पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले पुण्यात दोन दिवसांपूर्वी मेट्रोची चाचणी झाली. त्यावेळी मी, बापट पुण्यात नसताना हा कार्यक्रम घेण्यात आला. तरीदेखील आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालो होतो. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नव्हता, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

2016ला मेट्रोला परवानगी मिळाली. त्यावेळी अजित पवार नव्हते. मोदी आणि देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे यापुढे कार्यक्रमाला आम्हाला बोलावले नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही. तसेच शेवटच्या कार्यक्रमांना मोदींना बोलवावे लागेल, अशी भूमिकाही या वेळी त्यांनी मांडली.

पॅकेज आणि मदतमध्ये फरक काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौर्यावर आहेत. त्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एक भूमिका मांडली, ती म्हणजे पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत पॅकेज आणि मदत यामध्ये फरक काय? पॅकेज हा इंग्लिश शब्द आहे. पण मदत तर करा; पण काही होताना दिसत नाही. पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत करायला पाहिजे. मात्र हे अनेक अटी लावताना दिसत आहे. पासबुक, चेकबुक वाहून गेले आहेत. त्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करून स्लिप भरताच पैसे मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply