उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
जेएनपीटी बंदराचेच नव्हे; तर देशभरातील सरकारी मालकीच्या एकाही बंदराचे खासगीकरण करण्यात येणार नाही, तसेच कामगार हिताला बाधा येणार नससल्याची ग्वाही केंद्रीय नौकानयन, रसायने आणि खते राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया यांनी शनिवारी (दि. 14) दिली. ते जेएनपीटीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आले असता, पत्रकारांशी वार्तालाप करीत होते.
जेएनपीटीने बंदरातून तस्करीला पायबंद घालण्यासाठी मोबाईल एक्सरे कंटेनर स्कॅनरची सुविधा उभारण्यात आली आहे. जेएनपीटी यार्डमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून 220-333 केव्ही वॅट क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. पीयुबीशेजारील जेएनपीटी मार्गावरील वाय जंक्शनवर एक किमी लांबीचा फ्लायओव्हर ब्रीज आणि 32 कोटी खर्चून शिवस्मारक मेमोरियल म्युझियम असे विविध प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. त्यांचे उद्घाटन मंत्री मांडविया यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिव-समर्थ स्मारकात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी बंदरे ही देशाची संपत्ती असल्याचे स्पष्ट केले. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले.
शिवस्मारक मेमोरियल म्युझियमच्या उद्घाटनानंतर मंत्री मांडविया यांनी शिवस्मारकाची पाहणी केली. स्मारकाच्या सभागृहात शिवकाळातील विविध प्रसंगांवर चितारण्यात आलेली अप्रतिम चित्रे छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पराक्रमाची आठवण करून देत आहेत. ही चित्रे ऐतिहासिक अजंठा, वेरूळ येथील चित्रांप्रमाणेच असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी जेएनपीटीच्या विविध विकासकामांची माहिती देतानाच बंदराबरोबरच येथील परिसराचाही विकास होत असल्याचा दावा मंत्री मांडविया यांनी केला.
उद्घाटन समारंभास खासदार मनोज कोटक, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष नरेश वाघ, सचिव तथा वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे, कुलकर्णी, कॅप्टन अमित कपूर, जेएनपीटीचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील, माजी विश्वस्त रवींद्र पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, सुनील पाटील, पंडित घरत आदी पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …