Monday , February 6 2023

नवीन भाजी मंडई संकुलाचा तिढा सुटणार

खोपोलीतील व्यापारी व नगरपालिकेमध्ये चर्चा

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केटच्या ठिकाणी वाहन तळासह अद्यावत भाजी मार्केट संकुल निर्मिती करण्याचा  नगरपालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत नगरपालिका व भाजी मार्केट व्यापारी संघ यांच्यात काही मतभेद आहेत. सदर प्रकरण कोर्टात ही गेले आहे. दरम्यान, या संबंधी सर्वमान्य मार्ग काढण्यासाठी येथील व्यापारी संघ व नगरपालिका यांच्यात बैठका सुरू आहेत. या बैठकांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच नगरपालिका व व्यापारी यांच्यात एकमत होऊन नवीन भाजीपाला मार्केट निर्मितीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. खोपोली शहरातील मध्यवर्ती भाजी मंडई इमारत जर्जर झाल्याने धोकादायक बनली आहे. नगरपालिकेकडून या ठिकाणी नवीन भाजी मंडई संकुल व वाहनतळ निर्मिती प्रस्तावित आहे. त्याचे काम सुरू झाल्यावर हे संकुल पूर्णत्वास येण्यासाठी जवळपास दीड ते दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. या दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात भाजीमंडई निर्मिती करून येथील व्यापार्‍यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा नगरपालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र या बाबत नगरपालिका व येथील भाजीपाला विक्रेते आणि भाजी मार्केट व्यापारी संघ यांच्यात मतभेद आहेत. या बाबत मार्ग काढण्यासाठी सोमवारी (दि. 16) भाजीपाला विक्रेते, व्यापारी संघ पदाधिकारी व नगरपालिका यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत नवीन तात्पुरत्या भाजी मंडईमधील जागा वाटप, येथील अन्य सुविधा तसेच वीज, पाणी आणि स्वछतेबाबत नगरपालिका काय करणार, त्याचा कार्य अहवाल देण्याची मागणी भाजीपाला विक्रेते व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी केली. तसेच नवीन भाजी मार्केटचे काम निविदा अटीशर्ती व ठरलेल्या मुदतीत पूर्ण होईल, याचीही हमी मागितली. नगरपालिकेकडून या पैकी बहुतेक बाबी मान्य केल्या असल्याचे समजते. मात्र दोन तीन प्रमुख मागण्यांबाबत अद्यापही एकवाक्यता झाली नाही. चर्चेतून यातून नक्की मार्ग निघेल, अशी आशा नगराध्यक्ष सुमन औसरमल यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला मार्केट उभारणी कामाला लवकरच शुभारंभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवीन भाजी मंडई संकुल उभारण्यास आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. काही महत्वाच्या व आवश्यक मागण्या आम्ही नगरपालिकेकडे केल्या आहेत. त्याबाबत नगरपालिकेकडून लेखी हमी मिळण्याची गरज आहे.

-वसंत वझरकर, पदाधिकारी, भाजीपाला मंडई व्यापारी संघ

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply