रायगडातील बळीराजा हताश

अलिबाग : प्रतिनिधी
मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 8 हजार हेक्टर क्षेत्रावरील भात शेती झोपली आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक गमावण्याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे.
राजाने मारलं आणि पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची, याची प्रचिती सध्या संपुर्ण महाराष्ट्रात येत आहे. रायगडमध्ये ही परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले भाताचे पीक हिरावून घेतले आहे. तयार पीक आडवे झाले आहे. त्या शेतकरी हताश झाला आहे.
2020 या वर्षात एका मागून एक संकट येत आहेत. निसर्ग वादळाचा रायगडातील किनारपट्टीवरील तालुक्यांना फटका बसला त्यातून सावरत शेतीच्या कामात गुंतलेल्या शेतकर्यांला यंदाच्या पावसाने समाधान दिले खरे पण पीक तयार झाले, कापणीला आले आणि परतीच्या पावसाचा तडाखा बसला.
मागील तीन दिवस रायगड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसाने तयार झालेल्या भात पिकाची प्रचंड हानी केली. कापणीला आलेले पीक आडवे झाले. ते पाण्याखाली गेल्याने दाणा कुजण्याची धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी शेतकर्यांनी पीक कापून बांधावर वाळण्यासाठी टाकले आहे. परतीच्या पावसाने केलेल्या या नुकसानी मुळे शेतकर्यांचे कंबरडेच मोडले आहे.
हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी नुकसानभरपाई ची मागणी करीत आहेत. जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. अशी स्थिती पुढील काही दिवस कायम राहिल्यास भात पिकावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कर्जत, सुधागड – पाली, माणगाव, रोहा, तळा या डोंगराळ तालुक्यामध्ये लवकर तयार होणारे भात पीक जास्त प्रमाणात घेतले जाते, या पिकाला यावर्षी फटका बसू शकतो. अलिबाग, पेण, उरण तालुक्यातील खलाटीतील भातपीक यापूर्वीच अतिपाऊस आणि वार्यामुळे आडवे पडले आहे. काही दिवसातच भाताची कापणी सुरु करणे गरजेचे आहे. परंतु त्या साठी पाऊस थांबण्याची आवश्यक आहे.
लवकर तयार होणारे भातपीक तयार होत आले आहे. पावसाच्या लहरीपणात कापणी करणे योग्य नाही. शेतात पाणी साचू नये, यासाठी शेतकर्यांनी पाण्याचे मार्ग खुले करावेत आणि वातावरण निवळण्याची वाट पहावी.
-पांडुरंग शेळके, अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड