Breaking News

आरोग्य संदेशासाठी सायकलवरून 1355 किमीचा प्रवास

पुणे ः प्रतिनिधी :  आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनील कुकडे यांनी सायकलवरून पुणे ते विषाखापट्टणमपर्यंत 1355 किलोमीटरचा प्रवास केला. दररोज 200 किलोमीटर सायकलिंग करून हा प्रवास 70 तासांमध्ये पूर्ण केला. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. एकट्याने हा संपूर्ण प्रवास केला असून, यातून त्यांना आरोग्याचा संदेश द्यायचा आहे.

पुण्यात एका खासगी कंपनीत काम करणार्‍या कुकडे यांनी 2014 साली मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. त्यानंतर त्यांनी पुढील अनेक वर्षे मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. 42 किलोमीटरची मॅरेथॉनही त्यांनी वेळेत पूर्ण केली. आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सायकलिंग गरजेचे असल्याने त्यांनी सायकलिंग सुरू केली. त्यातही त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पुणे-पाचगणी-पुणे, पुणे-कोल्हापूर-पुणे असे अनेक टास्क त्यांनी पूर्ण केले. न थांबता त्यांनी हे अंतर पार केले. त्यानंतर त्यांनी आरोग्याचा संदेश देण्यासाठी सोलो राईड करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पुणे ते विशाखापट्टणम हा 1355 किलोमीटरचा मार्ग निवडला.

15 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी या राईडला सुरुवात केली. दररोज तब्बल 200 किलोमीटरचा टप्पा ते पार करत गेले. रात्री केवळ विश्रांतीसाठी थांबत होते. सकाळी पुन्हा निघत असत. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत ते प्रवास करत. या प्रवासात त्यांची कुठेही सायकल खराब झाली नाही की ते आजारी पडले नाही. आरोग्याचा संदेश द्यायचा, या एका ध्येयासाठी ते प्रवास करीत होते. या प्रवासात त्यांना अनेक लोक भेटले. त्यांनी त्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या या राईडवरून प्रभावित होत त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फीदेखील घेतले. अवघ्या सात दिवसांमध्ये त्यांनी पुणे ते विशाखापट्टणम हे अंतर पार केले. कुकडे म्हणाले की, सर्वत्र वाहनांची संख्या वाढत आहे. प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ट्रॅफिकमध्ये अडकून अनेकांचा वेळही वाया जात आहे. यात नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा संदेश देण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलायला हवीत, हादेखील संदेश लोकांपर्यंत जावा यासाठी पुणे ते विषाखापट्टणम सायकलिंग करण्याचा निर्णय घेतला. मी दररोज कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत नसल्यामुळे वेळही मोठ्या प्रमाणावर वाचतो, म्हणून माझे नागरिकांना आवाहन आहे की, त्यांंनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply