Breaking News

दहशतवादी हल्ले करणारा पाक मोकाट कसा?

बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. मसूदच्या विरोधात मत न देऊन चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी संसदेचे सदस्य बिलावल भुट्टो जरदारी यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून घरचा आहेर दिला आहे. पीपीपीचे अध्यक्ष असणार्‍या बिलावल यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर सरकारचा वचक नसून ते मुक्तपणे काम करत असल्यचा आरोप केला आहे. दुसर्‍या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये मोकाट कसे फिरत आहेत, असा सवाल बिलावल यांनी सत्ताधार्‍यांना केला आहे.

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणार्‍या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारला बिलावल यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले. पाकिस्तानमधील सक्रिय दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई केली जात नाही. माझ्या आईचीही हत्या याच कारणामुळे झाली. हे दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये लहान मुलांचे प्राण घेत आहेत. परदेशांमध्ये दहशतवादी कारवाया करत आहेत. आज संपूर्ण पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागत असल्याचे बिलावल म्हणाले आहेत. तसेच इम्रान खान यांच्या सरकारमध्ये नेतेपदावर असणार्‍या तीन जणांचे बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी चांगले संबंध असल्याचा गौप्यस्फोटही बिलावल यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा हात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारच्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले करणार्‍या संघटनांना पाकिस्तानमध्ये कोणतही स्थान नसल्याचे म्हटले होते. सर्व दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन इम्रान यांनी दिले होते. यानंतर काही दिवस ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या कार्यालयावर बंदीची कारवाई करण्यात आली, मात्र त्यानंतर पुन्हा सर्व स्थिती जैसे थे झाली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादाला चीनही खतपाणी घालत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या बैठकीमध्ये मसूदविरोधातील प्रस्ताव फेटाळून दाखवून दिले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply