Breaking News

पनवेलमध्ये मराठी नववर्षाचे शोभायात्रेने जोरदार स्वागत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षानिमित्त पनवेल शहरात मंगळवारी (दि.9) नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत रामरथ, लेझीम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपरिक वेषभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शोभायात्रेत सहभाग घेत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नव्या वर्षाचे स्वागत करण्याकरिता पनवेलमध्ये नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येते. 1998पासून ही परंपरा अविरत सुरू असून यंदाचे या शोभायात्रेचे रौप्य महोत्सवी अर्थात 25वे वर्ष होते. शोभायात्रेला पनवेल शहरातील वडाळे तलावापासून सुरुवात झाली. गावदेवी पाडा, दांडेकर हॉस्पिटल, स्वामी हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, आदर्श लॉज, जुने प्रांत कार्यालय, गावदेवी पाडा, धुतपापेश्वर कॉर्नर, महात्मा फुले मार्ग, श्री विरूपाक्ष महादेव मंदिर, जय भारत नाका, अन्नपूर्णा चौक, लोकमान्य टिळक रोड असे मार्गक्रमण करीत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात शोभायात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेत महिला तसेच लहान मुले पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. विविध संस्थांच्या वतीने शोभायात्रेदरम्यान सामाजिक विषयांसदर्भात जनजागृती करण्यात, तर विविध मंडळांच्या वतीने आलेल्या नागरिकांना पाणी, सरबताचे वाटप करण्यात आले. शोभायात्रेत स्त्रीशक्तीसोबत विविधतेतून एकतेचा संदेश देण्यात आला. या वेळी बालकांचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता, तर युवानाद ढोल पथकाच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता.
शोभायात्रेनिमित्त एक ते सात वर्ष, आठ ते 15 वर्ष आणि खुल्या गटात वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विजयी झालेल्यांना आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आयोजक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
नवीन वर्षामध्ये सर्व मंगल घडत राहो, ज्या ज्या क्षेत्रात काम करीत आहात त्या क्षेत्रात पराक्रम करा तसेच हिंदू राष्ट्र आणि नवभारत घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सर्व नागरिकांना दिल्या.
या शोभायात्रेत भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी तसेच संजय जैन, संजय भगत, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, केदार भगत, प्रितम म्हात्रे, रूपेश नागवेकर, स्वाती कोळी, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह विविध संस्था, संघटना, मंडळांचे पदाधिकारी आणि पनवेलकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply