पाली : प्रतिनिधी
पाली खोपोली राज्य महामार्गावर सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या परळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोच शिवाय बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील रस्त्याने चालणे मुश्किल होते. यासंदर्भात वारंवार परळी ग्रामपंचायत व पाली पोलीस यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी देखील परळी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. पोलिसांनी कारवाई केली की थोडे दिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटायचा. परंतु दोन तीन दिवसानंतर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण व्हायची. या पार्श्वभूमीवर पाली पोलिसांच्या वाहतूक शाखेने तसेच पाली पोलिस ठाणे अंतर्गत जांभुळपाडा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस यांनी संयुक्तरीत्या परळी बाजारपेठेत धडक मोहीम राबविली. या धडक मोहिमेत साधारणपणे 58 केसेस करण्यात आल्या तर 29,500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ए.एस. आय. मोहन म्हात्रे, एस. एस. खेडेकर, निलेश महाडिक, कांचन भोईर, बी. एच. वाव्हळ आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परळीकर समाधान व्यक्त करत असून पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई अधून मधून करावी अशी मागणी जोर धरत आहे.