Breaking News

पंतप्रधानांच्या आवाहनाला क्रीडापटूंचा पाठिंबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून संपूर्ण मानवजात या आपत्तीला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे. भारतातही उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी येत्या रविवारी (दि. 22) लोकांनी स्वत:च्या घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे अन्य क्रीडापटूंनीही आपले समर्थन दर्शविले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. त्या वेळी या साथीच्या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने कोरोनापासून स्वत:चे रक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. पंतप्रधानांच्या या जनता कर्फ्यूला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
फिटनेससाठी सतर्क असणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. सावधान राहा, सतर्कता बाळगा. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि फैलाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. भारताचे नागरिक म्हणून जबाबदारीने वागा. पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेले सुरक्षिततेचे उपाय पाळा आणि कोरोनाशी दोन हात करा, असा संदेश विराटने दिला आहे.
फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने म्हटले की, मान्य करा किंवा नको, पण एक अरब लोकसंख्येच्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्याची गरज आहे. याशिवाय हरभजन सिंग, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, विनेश फोगाट, साक्षी मलिक, हॉकीपटू राणी रामपाल यांनीही जनता कर्फ्यूला समर्थन दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले की, चला, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपण 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावू. एक देश म्हणून आपल्याला संयम दाखविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सलामीवीर शिखर धवन याने सांगितले की, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तुम्ही सर्व जण सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply