Sunday , February 5 2023
Breaking News

वावड्यांचा धुरळा

राजकारणामध्ये वावड्यांचे पतंग उडायला लागले की थांबता थांबत नाहीत. कुणाची पतंग किती उंच जाते आणि अन्य किती पतंगांचा मांजा काटते याचीच उत्सुकता लागून राहते. समाजमाध्यमे शिरजोर झाल्यानंतर असल्या प्रकारच्या राजकीय वावड्या हा मनोरंजनाचाच भाग झालेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाकडे मनोरंजन अथवा विरंगुळ्याचे साधन म्हणून कुणी पाहात नव्हते. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्रात राजकीय वावड्यांना आणि पतंगबाजीला उधाण आलेले दिसते. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेलच, असे सूचक उद्गार काढून खळबळ उडवून दिली होती. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडणार का, अशी शंका भल्या भल्या राजकीय पंडितांच्या मनामध्ये तरळू लागली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आणखी भर घातली. औरंगाबाद येथे झालेल्या सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे आणि भाजपचे नेते व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच मंचावर उपस्थित होते. त्या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे बघत माझे भावी सहकारी असे सूचक संबोधन केले. या संबोधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय भूकंप निश्चित झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे. राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमस्वरुपी शत्रू नसतो अथवा मित्रही नसतो हे सुभाषित खरे असले तरी असल्या राजकीय घडामोडी इतक्या उघडपणे घडत नसतात हेही ध्यानात घ्यायला हवे. मुख्यमंत्र्यांच्या सूचक संबोधनामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते चक्रावून गेल्यासारखे झाले आहेत. पडद्यामागे काही राजकीय घडामोडी चालू आहेत काय, याची चाचपणी एव्हाना काही नामवंतांनी सुरूदेखील केली असेल. रावसाहेब दानवे यांना माझे भावी सहकारी असे म्हणण्यामागे मुख्यमंत्र्यांचा नेमका हेतू काय असू शकतो, हा खरा सवाल आहे. भाषणाच्या ओघात नर्म विनोद करून हशा पिकवण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांची सवय जुनीच आहे आणि महाराष्ट्राला ती परिचित आहे. केवळ विनोद साधण्यासाठी त्यांनी ही गंमत केली असावी, असा त्यांच्या मित्रपक्षांना विश्वास वाटतो. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी नेमकी हीच भावना बोलून दाखवली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि दानवे यांच्यातील जाहीर प्रेमळ संवादाच्या वेळी मंचावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. या संभाषणानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर खुलासा केला की, महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल चाललेले नाही एवढे मात्र मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. पुढे काय होईल हे येणारा काळच ठरवेल. कार्यक्रमानंतर समाजमाध्यमांवर काही क्षणांतच वावड्या आणि अफवांचा वणवा पेटला. तरीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानाबद्दल कुठलीही सारवासारव केली नाही हे मात्र लक्षणीय मानावे लागेल. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आणि मुख्यमंत्र्यांनी केलेले सूचक संबोधन या दोहोंचा अर्थ संभाव्य शिवसेना-भाजप युतीशी जोडणे हे मात्र खुळेपणाचे ठरेल. सद्यस्थितीमध्ये तरी हे एकेकाळचे मित्रपक्ष पुन्हा एकत्र येतील, अशी सुतराम शक्यता नाही. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते परस्परांपासून बरेच दुरावले आहेत. त्यांना एकत्र आणण्यासाठी खूप मोठी शक्ती अवतरावी लागेल.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply