नवी मुंबई : बातमीदार
कोरोनामुळे बांधकाम साइट, विविध ठिकाणी सुरू असलेली कंत्राटी कामे आणि मोलमजुरीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे नाका कामगार अडचणीत आले आहेत. सकाळपासून ताटकळत नाक्यावर थांबून काम न मिळाल्यामुळे या कामगारांना रिकाम्या हाताने घरी जावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी एक हजार कामगारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. नवी मुंबई शहरात सुमारे 25 ठिकाणी कामगारांचे नाके आहेत. या नाक्यांवर वर्षभर हजारो मजुरांची मोठी गर्दी असते. गेल्या 15 दिवसांपूर्वी सर्वच नाके सकाळी 11 नंतर रिकामी व्हायची. सर्व मजुरांच्या हाताला काम मिळायचे. मात्र सध्या कोरोना विषाणूचा वाढत चाललेला फैलाव कमी करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे उद्योग ठप्प झाल्याने नाका कामगार आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहेत. त्यांची अडचण लक्षात घेऊन किशोर पाटकर यांनी वाशी येथील सेक्टर 15 मध्ये असलेल्या नाक्यावरील एक हजार नाका कामगारांना सुमारे दोन हजार किलो धान्याचे वाटप केले. या वेळी वैशाली पाटकर, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.