Breaking News

पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करणार ; गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी येथील महानगरपालिकेने चारशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन त्याच्या डीपीआरला मान्यता देऊ, तसेच ही घरे बांधताना नवीन

तंत्रज्ञान वापरून कमी वेळेत ती उभी करू, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी

(दि. 4) येथे केली. याद्वारे त्यांनी सिडको अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासह पनवेलवासीयांना मोठे गिफ्ट दिले आहे. या वेळी उपस्थितांनी ‘एकच वादा प्रशांतदादा’ अशा घोषणा दिल्या.

सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या महाशिबिराचे उद्घाटन ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी सभापती मनोहर म्हात्रे, आरपीआयचे नेते नगरसेवक जगदिश गायकवाड, डॉ. गिरीश

गुणे आदी मान्यवर प्रामुख्याने

उपस्थित होते.

ठाकूर कुटुंबीयांचे सामाजिक काम खूप मोठे आहे. त्यातच आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष म्हणून काम करताना प्रशांत ठाकूर यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. त्यामुळे ‘अबकी बार एक लाख पार’ असा निकाल पनवेल विधानसभा मतदारसंघात लागेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले, तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

ना. विखे-पाटील आमदार प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा देताना म्हणाले की, सिडको अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. या संधीचे त्यांनी सोने करताना समाजासाठी त्याचा उपयोग केला आहे. सामाजिक भावनेतून एखादे शिबिर घेतले जाते, पण तब्बल 12 वर्षे आरोग्य महाशिबिर घेणे कौतुकास्पद आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वारसा आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे नेण्याचे कामकेले आहे. सभागृहात काही मोजकेच सदस्य अभ्यासपूर्ण पद्धतीने विषयाची प्रभावी मांडणी करतात. त्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश असल्याचेही मंत्रिमहोदयांनी आवर्जुन सांगितले.

महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आमदार प्रशांत ठाकूर समाजासाठी खूप मोठे काम करीत असल्याचे सांगताना कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी धन्वंतरी आरोग्य सेवा संस्थेची स्थापना केल्याची माहिती दिली.

प्रास्ताविक भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले; तर आभार डॉ. संतोष जाधव यांनी मानले. या वेळी जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरज पडल्यास पुन्हा शिबिर घेऊ : रामशेठ ठाकूर

समारंभाचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, पावसामुळे अनेकांना शिबिराला येता आले नाही. त्यामुळे गरज पडल्यास पुन्हा शिबिर घेऊ, असे जाहीर केले. ते पुढे म्हणाले की, जोरदार पाऊस कोसळत असताना आरोग्य महाशिबिराचे काय होणार याची चिंता होती, पण ना. राधाकृष्ण विखे-पाटील वेळेत आले. वेळ पाळणारे हे मंत्री आहेत. त्यांच्या वडिलांचे व माझे चांगले संबंध होते. त्यांच्या घराण्याला मोठा वारसा आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन पुढील वर्षी शिबिराच्या नियोजनावेळी उपयोगी पडेल.

आपल्या कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत वाढदिवस साजरा न करता आमदार प्रशांत ठाकूर समाजासोबत वाढदिवस साजरा करतात, हे कौतुकास्पद आहे. या महाशिबिरामुळे सीकेटी महाविद्यालयाचा हा परिसर आरोग्य पंढरी झाला आहे.

-बाळासाहेब पाटील, सभापती

कोकण म्हाडा महामंडळ

मुख्यमंत्र्यांना महाजनादेश मिळेल : आ. प्रशांत ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महाजनादेश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच उद्घाटन होईल व ते सेवेत दाखल होईल, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पनवेलमधील रुग्णांना एक कोटी 40 लाखांची मदत मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. ना. राधाकृष्ण विखे-पाटील मल्हार महोत्सवाला आले होते. त्यांचे प्रेम, मार्गदर्शन सातत्याने मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आठ हजारांहून अधिक रुग्णांनी

घेतला आरोग्य महाशिबिराचा लाभ

आरोग्य महाशिबिराच्या सर्व समित्यांनी, डॉक्टर्स, स्वयंसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सीकेटी कॉलेजने केलेल्या नियोजनामुळे व घेतलेल्या अथक परिश्रमामुळे तुफान पाऊस असतानाही आरोग्य महाशिबिर यशस्वी झाले. आठ हजारांहून अधिक रुग्णांनी या स्तुत्य उपक्रमाचा लाभ घेतला.

या महाशिबिरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा चारशेहून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. या वेळी सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, मधुमेह, नाक-कान-घसा, हाडांचे रोग, ईसीजी, हिमोग्लोबिन, आयुर्वेद अशा विविध तपासण्यांसह औषधोपचार देण्यात आले. त्याचप्रमाणे नेत्रतपासणी करून चष्मेवाटप करण्यात आले. तपासणी आणि औषधोपचाराबरोबरच रुग्णांसाठी न्याहारी, भोजन, वाहतूक आदी चोख व्यवस्था करण्यात आली होती.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply