नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांसह विभागातील अनेक गावांमध्ये इतर ठिकाणच्या (बाहेरील) व्यक्तींना प्रवेशबंदी केली असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून रस्ते ताबडतोब खुले करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या सूचनेनुसार विशेष शाखेचे हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक यांनी केले आहे. नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोठणे शहरात काही आळींसह संपूर्ण विभाग, सुकेळी विभाग, वांगणी विभाग, वेलशेत, शिहू विभागातील काही गावांच्या वेशीवर, तसेच आळींच्या प्रवेशद्वारावर रस्ते बंद करून आत येण्यास बाहेरच्या माणसांना अटकाव केला आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून गावात येण्यासाठी कोणालाही प्रतिबंध करू नये, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आपल्या गावात शेजारच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील अथवा इतर देशातील कोणी व्यक्ती आल्यास त्याबाबतची माहिती ग्रामपंचायत, नागोठणे पोलीस ठाणे, रोहे किंवा पेण तहसील कार्यालय व सरकारी हॉस्पिटल येथे द्यावी. रस्ते बंद करू नये, असे आवाहन महाडिक यांनी केले आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …