रोहे : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगामी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. पाऊस संपला की लग्न सराई व अनेक मोठ मोठे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रामाची कायमस्वरुपी आठवण रहावी म्हणुन हा सोहळा टिपणारा छायाचित्रकार व शुटींग करणारे व्यवसायिक लाखो रुपये कर्जानी काढुन यावर्षी कॅमेर्यात गुंतवणुक केली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक अडचण जाणवू लागली आहे. यामुळे या छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
रोहा तालुक्यातील रोहा शहरासह वरसे, रोठ, चणेरा, तांबडी, कोलाड, नागोठणे या सारख्या मोठ्या गावांसह खेडोपाडी फोटो काढण्याचा व्यवसाय करित आहेत. रोहा तालुक्यात 100च्या आसपास फोटोग्राफी व्यवसाय करणारे आहेत. फोटोग्राफी हेच त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. येथील सर्वच छायाचित्रकारांचे कामकाज सुरु असलेली दुकाने बंद पडल्याने त्यांच्या उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबियाला सांभाळणार कसे, असा प्रश्न त्यांना सतवत आहे. त्यामुळे छायाचित्रकार आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी, अशी इच्छा येथील प्रत्येक छायाचित्रकाराने शासनाकडे व्यक्त केली आहे.
लाखो रुपये खर्च करुन अनेक कॅमेरे घेण्यात आले असुन अनेक व्यवसायिकांनी कर्ज काढुन या व्यवसायात गुंतवणुक केली आहे. परंतु हंगाम चालु होण्याआधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्यामुळे माझ्या सारखे अनेक फोटोग्राफी व्यवसायीक आर्थिक संकटात सापडले आहेत.
-नितिश सकपाळ, फोटोग्राफी व्यवसायिक, रोहा