Breaking News

अपुरी झोप : गंभीर आजारास निमंत्रण

इंटरनेटच्या जमान्यात तरुण हे मोबाइलमध्ये गढलेले असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी तरुण मोबाइलवर ऑनलाइन स्ट्रिमिंगवर चित्रपट, वेबमालिका किंवा तत्सम काही पहात असतात. त्याचा मेंदूवर, डोळ्यांवर परिणाम होतोच, पण झोपेवरही परिणाम होतो. मुळात झोपच शांतपणे पूर्ण होत नाही. अपुरी झोप किंवा सात तासांपेक्षा कमी होणारी झोप ही गंभीर आजारांना आमंत्रण देणारी असते. त्यामुळे झोप पूर्ण करण्यासाठी प्रयत्न जरूर करावे.

मनुष्याला साधारणतः आठ ते दहा तास झोपेची गरज असते. नोकरीच्या चक्रात अडकलेल्या तरुणांना मात्र केवळ 5 तासच झोप मिळते. वीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांमध्ये ही गोष्ट आढळून येते. ही गोष्ट त्यांच्या आरोग्यासाठी निश्चिंतच धोकादायक आहे. झोपेचे चक्र बिघडल्यास त्याचा परिणाम विविध अवयवांच्या कार्यक्षमतेवरही होऊ शकतो. रोज 7 तासांपेक्षा कमी झोप होत असेल तर आपल्याला सावध होण्याची गरज आहे. वैज्ञानिकांनी याविषयी नुकतेच एक संशोधन केले त्यानंतर एक निष्कर्ष काढला. वीस वर्षांपेक्षा अधिक वयाचे तरुण सध्या केवळ 5 तासांची झोप घेतात. मात्र, दीर्घ काळ असे होत राहिल्यास ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. संशोधकांच्या मते आठवड्यातून चार दिवस तरी किमान 7 तास झोप मिळणे आवश्यक आहे. अपुरी झोप किंवा कमी झोपेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोघांवरही प्रभाव पडतो. एवढेच नव्हे तर वैज्ञानिकांनी सततच्या अपुर्‍या झोपेमुळे होऊ शकणार्‍या काही आजारांचाही उल्लेख केला आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार अपुर्‍या झोपेमुळे तरुणांमध्ये हे आजार वाढत असल्याचे दिसून येते.

आपले आजी-आजोबा ‘नेहमी लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्य लाभे’ असे म्हणत असत. मात्र, सध्याच्या लाईफस्टाईलचा फंडा थोडक्यात जीवनशैलीतील बदलांमध्ये रात्री उशिरा किती जागायला सांगा, पण लवकर उठायला सांगू नका, असा बदल झाला आहे. त्याच इंटरनेटचे मायाजाळ हे खरोखरीच एक जाळेच आहे, ज्यात व्यक्ती खेचला जातो. नोकरीमध्येही सध्या इंटरनेटच्या वापराचे प्रमाण अधिक आहे. तसेच रात्रपाळीमध्ये काम करण्याची संस्कृतीही रुजली आहे. त्यामुळेच आरोग्यावरचे दुष्परिणाम होत आहेत. अर्थात नोकरी, व्यवसाय सोडून देणे शक्य होणारही नाही मात्र त्यातूनही झोपेचे तंत्र आणि वेळ तसेच काही जीवनशैलीतील बदलांचा स्वीकार केला तर काही विकार दूर ठेवण्यासही मदतच होईल.

– डॉ. योगेश चौधरी

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply