संचारबंदी असतानाही दुकानासमोर पडदा लावून भाजी विकण्याचा प्रकार
उरण : प्रतिनिधी
कोरोना संसर्गजन्य व्हायरसचे जंतू पसरू नये यासाठी राज्य सरकारने अखेर संचारबंदी लागू केली असून, प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असताना, उरण तालुक्यातील चिरनेर, कोप्रोली नाक्यांवर परप्रांतीय भाजी विक्रेत्यांकडून दुप्पट रकमेच्या भावाने ग्राहकांची लूट करीत आहेत. नवी मुंबई वाशी येथील एपीएमसी फळ व भाजी मार्केट 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचा गैरफायदा घेत हे परप्रांतीय येथील स्थानिक ग्राहकांची लूट करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. देशात कोरोना बधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोरोना संसर्ग जंतूंचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असताना नागरिक एक दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर मात्र काहीएक कारण नसताना ठिकठिकाणच्या नाक्यांवर गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाला खरेदी, विक्रीसाठी सकाळी 9.30 ते 12 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिलता करण्यात आहे. संचारबंदी शिथिलतेच्या नंतरही दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत भाजीपाला विक्री दुकानाच्या समोरील पडदा ओढून हे परप्रांतीय भाजीविक्रेते राजरोसपणे भाजी विक्री करीत असून, महिला व पुरुष मोठ्या संख्येने गर्दी करून दुप्पट भावाने भाजी खरेदीला बळी पडत असल्याचे चित्र दिसत होते.