Breaking News

मदतीचा हात

एकीकडे प्रारंभी भयभीत होऊन वारेमाप खरेदी करून बसलेल्या शहरी लोकांना अन्नधान्य, भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे हे पाहून दिलासा वाटत आहे, तर तुटपुंजी कमाई असलेली मंडळी मात्र आर्थिक चणचणीमुळे आजही रोजच्या पोटापाण्याच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.

कोरोनाच्या संभाव्य वाढत्या फैलावाचा धोका ध्यानात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजनेची पावले टाकली आहेत. 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून अवघ्या देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आणि देशातील कोट्यवधी नागरिकांच्या दैनंदिन जगण्याचे रूपडेच पालटून गेले. सरकारी वा खाजगी कार्यालयांतून काम करणार्‍या मंडळींपैकी शक्य तितक्यांनी घरून काम सुरू केले असले तरी अनेकांना हा पर्याय उपलब्ध नसल्याने निरनिराळ्या क्षेत्रांतील कंपन्यांचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. उदाहरणादाखल पाहायचे झाले तर मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येऊन काम करण्याचा व्यवसाय असलेल्या चित्रपट उद्योगातील नवीन चित्रीकरणाचे कामकाज पूर्णत: ठप्प आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने अन्नधान्याच्या पुरवठाधारांना संचारबंदीतून वगळले असले तरी ऑनलाइन स्टोअर चालवणार्‍या काही कंपन्यांना गरजेच्या या वस्तूंचा पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. उत्पादक कंपन्यांकडून होणारा गरजेच्या सामग्रीचा पुरवठा आणि हा माल लोकांपर्यंत पोहचवणे या दोन्ही आघाड्यांवर संचारबंदीमुळे अडथळे येत असल्याच्या तक्रारी किरकोळ दुकानदार करू लागले आहेत. एकीकडे त्यांची ही गार्‍हाणी आहेत तर गरजेच्या सामग्रीच्या खरेदीच्या नावाखाली बाहेर पडणार्‍यांची गर्दी होऊ नये म्हणून त्यांच्या संख्येवर मर्यादा आणताना पोलिसांना नाकीनऊ येत आहेत. शहरी भागात ही परिस्थिती आहे तर ग्रामीण वा निमशहरी भागातही जनजीवन हलकेहलके लॉकडाऊनचे वास्तव स्वीकारत बदलू लागले आहे. 21 दिवस घरातच बसून राहायचे या अकस्मात अंगावर कोसळलेल्या बंधनामुळे भांबावून गेलेली जनता हलकेहलके कोरोनारूपी संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होऊ लागली आहे. तीन आठवड्यांच्या या प्रदीर्घ काळात काम न करता घरात बसून राहून आपला निभाव लागणार कसा, खाणार काय या चिंतेने हबकलेल्या गोरगरीब जनतेला केंद्र सरकारने गुरुवारी मोठा दिलासा दिला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अकस्मातपणे बदललेल्या या परिस्थितीत तळागाळातील जनतेकरिता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा दिली आहे. कोरोनानामक या घातक विषाणूशी देशभरातील आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर झुंज देत आहे. या लढ्यात जशी आपली डॉक्टरमंडळी न थकता प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत, तितकीच मोलाची मदत त्यांना साह्य करणार्‍या नर्सेस, रुग्णालय कर्मचारी आणि आशा वर्कर यांच्याकडूनही या कामी होत आहे. मदतीचे हे लाखमोलाचे व जोखमीचे काम आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता करणार्‍या आरोग्य विभागातील या कर्मचार्‍यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची महत्त्वाची घोषणाही श्रीमती सीतारामन यांनी केली. या सार्‍या सेवाभावी कर्मचार्‍यांप्रतिची आपली कृतज्ञतेची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे अवघ्या देशाने गेल्या रविवारी टाळ्या व थाळ्यांचा निनाद करून व्यक्त केलीच होती. त्या कृतज्ञतेला या विमा संरक्षणातून मूर्त स्वरूप मिळाले असेच म्हणावे लागेल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply