Tuesday , February 7 2023

‘दिबां’साठी एल्गार

लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासाठी भूमिपुत्रांनी अखेर आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. ‘दिबां’च्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने गुरुवारी सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी ठिकठिकाणाहून तब्बल एक लाखाहून अधिक भूमिपुत्र उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. विमानतळाच्या नामकरणावरून विनाकारण नवा राजकीय वाद निर्माण करू पाहणार्‍या संधिसाधू राजकारण्यांना ही मोठीच चपराक म्हणावी लागेल. भूमिपुत्रांनी केलेल्या या आंदोलनामुळे राज्यकर्त्यांचे डोळे उघडले तर बरेच. अन्यथा असे अनेक विशाल मोर्चे आणि उग्र आंदोलने त्यांना भविष्यातही बघावी लागतील हे त्यांनी ध्यानात ठेवावे.

रायगड, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याणसह नाशिक परिसरातील मिळून तब्बल एक लाखांहून अधिक भूमिपुत्रांचा विशाल मोर्चा बघितल्यानंतर राज्य सरकारचे डोळे उघडणार नसतील तर त्यांच्यासारखे संवेदनाशून्य तेच असेच म्हणावे लागेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचेच नाव द्यायला हवे, अशी मागणी सर्वच भूमिपुत्रांची आहे. ही मागणी नवीन आहे, असे मानण्याचेही मुळीच कारण नाही. महानगरी मुंबईतील विमानतळ अपुरे पडू लागल्यानंतर नव्या अत्याधुनिक विमानतळाची गरज भासू लागली. ती ओळखून 10-12 वर्षांपूर्वीच नवी मुंबई विमानतळाची जागा निश्चित करण्यात येऊन कागदोपत्री का होईना काम सुरू झाले होते. सन 2008पासून प्रस्तावित विमानतळाचे काम सुरू आहे तेव्हापासूनच स्व. ‘दिबां’चे नाव नव्या विमानतळाला देण्याची मागणी होत आहे. ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांची रायगड ही जन्मभूमी आणि कर्मभूमीदेखील. याच भूमीत त्यांनी रक्त, घाम आणि अश्रू शिंपून येथील भूमिपुत्रांसाठी प्रखर लढा दिला. संपूर्ण रायगड जिल्हा त्यांच्याप्रति कृतज्ञता भाव आणि श्रद्धा बाळगून आहे. प्रस्तावित विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची मागणी राजकीय स्वरुपाची नाही. तरीही दुर्दैवाने त्याबद्दल राजकारण केले जात आहे. दीड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारचा दृष्टिकोन रायगडवासीयांना तर कमालीचा नाराज करणारा ठरला आहे. नव्या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील त्याबाबत आग्रही असल्याचे सांगितले जाते, मात्र भूमिपुत्रांवर हा सरळसरळ अन्याय आहे. माननीय बाळासाहेब यांच्यामुळेच मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला हे अगदी खरे. मराठी माणसांचा बुलंद आवाज पार दिल्लीपर्यंत पोहचला तो बाळासाहेबांमुळेच हेही नि:संशय खरे, परंतु त्यांची स्मारके मुंबईमध्ये उभी राहात आहेत. यापुढेदेखील महाराष्ट्रात कुठे ना कुठे ती उभी होतील. स्व. ‘दिबां’चे मात्र तसे नाही. त्यांचे यथोचित स्मारक त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पनवेल, उरण, नवी मुंबईच्या परिसरातच व्हायला हवे. तेच त्यांच्या कार्याला उचित पावती दिल्यासारखे होईल. खरे पाहता नव्या विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याने कुणाचे काय बिघडते हेच समजू शकत नाही. विनाचर्चा सौहार्दाने ‘दिबां’च्याच नावावर शिक्कामोर्तब झाले असते तर याच लाखो भूमिपुत्रांनी रस्त्यावर उतरून पेढे वाटले असते. कारण नामकरणाची मागणी ही मुळातच राजकीय नसल्याने त्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नाही. भाजप तसेच शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी ‘दिबां’च्या नावाला नि:संदिग्ध पाठिंबा दिला आहे. सरकारने आता तरी हेकेखोरपणा सोडावा आणि भूमिपुत्रांच्या भावनेचा आदर करावा एवढीच अपेक्षा आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply