माणगाव ः प्रतिनिधी
सरकार कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. त्या अनुषंगाने माणगाव नगर पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या विषाणूची बाधा कोणाला होऊ नये यासाठी स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. नगर पंचायतीने नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी शुक्रवारपासून (दि. 27) नगर पंचायत हद्दीत सर्व भागात निर्जंतुकीकरण औषध फवारणी मारण्याचे काम हाती घेतले आहे. नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान स्वच्छता व आरोग्य समिती सभापती रत्नाकर उभारे, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, नीलम मेहता, शुभांगी जाधव, सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी राहुल इंगळे हे सफाई कामगारांना स्वच्छतेच्या दृष्टीने वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करीत आहेत. कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे अवाहन नगराध्यक्ष योगिता चव्हाण यांनी केले आहे.