Breaking News

राज्यात नामर्दांचे सरकार!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई, नाशिक ः प्रतिनिधी  
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 22 वर्षांच्या एका मुलीचा जीव जातो. वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, मात्र तरीही कारवाई होत नाही. राज्यात नामर्दांचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. सरकार, पोलीस दलाकडून बलात्कार्‍याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी या वेळी केला.
संजय राठोड यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. एका बलात्कार्‍याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सत्तेतील पक्षांची अशी एकी पहिल्यांदाच दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडेंना वाचवले. आता शिवसेना संजय राठोड यांना वाचवत आहे. हा चुकीचा पायंडा राज्यात पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते, तर त्यांनी राठोड यांना फाडून खाल्ले असते, अशा शब्दांत वाघ यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवर्‍याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न झाला. आता नवी माणसे उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील, मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलतच राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी सरकारला दिले.
या प्रकरणात पतीवर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी चित्रा वाघ म्हणाल्या की, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. किती तर म्हणे 90 टक्के बेहिशेबी मालमत्ता, मात्र याबाबतची माहिती मला अजून कळालेली नाही. जी कळाली ती पत्रकारांकडून कळाली. एफआयआरची कॉपीही व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाली. प्रत्यक्ष कॉपी पाठवायला एसीबीकडील माणसे संपली का, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच या प्रकरणात माझ्या नवर्‍याने एक रुपयाही घेतलेला नाही. जेव्हा हा प्रकार घ़डला, तेव्हा माझा नवरा त्या घटनास्थळाच्या पाच किमी परिसरातही नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडल्यामुळे सूडबुद्धीने आपल्या पतीवर बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. मात्र अशा प्रकारांनी मी खचणार नसून पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आवाज उठवतच राहणार, असेही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठणकावून सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply