Breaking News

नवी मुंबईत बाल मृत्यूदर आटोक्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित बालकांचे मृत्युचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले असून आतापर्यंत 10 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील फक्त एकच बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी हे नक्कीच दिलासादायक वृत्त आहे. तसेच मनपाच्या रुग्णालयात जवळपास साडेतीनशे कोरोनाबाधित महिलांची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ मोहीम प्रभावीपणे राबविली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णांचे प्रमाण वाढले तरी चालेल, परंतु मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जुलैमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त मृत्युदर होता. सद्यस्थितीमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांवर आणण्यात यश मिळविले आहे. प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. शहरात लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. प्रतिदिन दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 10 ते 15 जणांना कोरोची लागण होत आहे. मंगळवारपर्यंत या वयोगटात 1,768 जणांना प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे. 11 ते 20 या वयोगटांतील 2,905 जणांना लागण झाली असून, त्यापैकी पाच जणांचाच मृत्यू झाला आहे. लहान मुले व तरुणांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 90 टक्के पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना झालेल्या गरोदर महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात विशेष कक्ष सुरू केला आहे. डॉ. राजेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पाच डॉक्टरांचे पथक यासाठी कार्यरत आहे. आतापर्यंत 350पेक्षा जास्त महिलांची प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. महिला व अर्भकाला नवीन जीवनदान देण्यात आले आहे. आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, त्याही प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर मनपाच्या केंद्रात आल्या होत्या. 3,595 ज्येष्ठांची कोरोनावर मात : ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे, परंतु नवी मुंबईमध्ये कोरोनामुक्त होणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 4,790 जणांना आतापर्यंत कोरोना झाला असून, त्यापैकी 3,595 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीमध्ये 685 ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक

नवी मुंबईत तरुणांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. 40 वर्षे वयोगटापर्यंतचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. 11 ते 20 वयोगटांत कोरोनामुक्त होण्याचे सर्वाधिक 92.35 टक्के प्रमाण आहे.

मृत्युदर कमी करण्यावर महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे. सद्यस्थितीमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांवर आला आहे. कोरोना झालेल्या गरोदर महिलांनाही योग्य उपचार मिळवून देण्यात येत आहेत. – अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply