माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकरांचे आवाहन
माणगाव : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा जोर गर्दीमुळे वाढत आहे. यासाठी नागरिकांनी कोठेही गर्दी करू नका, प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे. प्रसार माध्यमांजवळ बोलताना उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी सांगितले, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरला आहे. या महामारीचा सर्वनाश करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सांगितलेल्या विविध सूचना व आदेशाचे पालन प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे. जगावर आलेली ही फार मोठी आपत्ती आहे. या आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे. नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतः करण्याची ही वेळ आली आहे. प्रशासन या संकटाला धैर्याने सामोरे जात आहे. प्रत्येक नागरिकाने याबाबत योग्य ती काळजी घेतल्यास या महामारीपासून आपला बचाव होईल. यासाठी स्वचछतेबरोबरच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना दुकानांतून गर्दी करू नका. तसेच गावांत जमावाने एकत्रित येवू नका. अशा काही गोष्टींकडे सर्वांनी लक्ष दिल्यास आपण या महामारीपासून मुक्त होऊ असा विश्वास प्रशाली जाधव दिघावकर यांनी व्यक्त केला.