कर्जत ः बातमीदार
लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब, रोजंदार, भटकंती करणारे निराधार तसेच भिक्षेकरींना अन्न-पाण्यावाचून उपासमारीस सामोरे जावे लागत आहे, परंतु लॉकडाऊन काळात गरजवंतांना दोन वेळ पोटभर अन्न देऊन दगडे खानावळीच्या बेबीताई दगडे या माऊलीने त्यांना देवदूताप्रमाणे आधार दिल्याने कर्जतसह राज्यात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्याकडून कर्जत रेल्वेस्थानक परिसरातील सुमारे 50 ते 60 गरजवंतांना कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन व कर्जत आरपीएफ यांच्या माध्यमातून शिजवलेल्या अन्नाची पाकिटे देण्यात आली. लॉकडाऊन काळात रोजगारीचे काहीही साधन उपलब्ध नसल्यामुळे उपासमारीस सामोरे जात असलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील गरजूंनी सर्वांचे याबाबत आभार मानले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक तथा दगडे खानावळीचे जगदिश दगडे, कर्जत आरपीएफचे विश्वनाथ सिंग, आरपीएफ संजय घोडके, उबाळे, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकेश पाटील, सचिव प्रभाकर गंगावणे, खजिनदार विनोद पांडे, सहसचिव संकेत घेवारे, सामाजिक कार्यकर्ते मन्सुरी बोहरी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनतर्फे कर्जत रेल्वे आरपीएफ अधिकारी व कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझरही देण्यात आले.