आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या व्यापार्यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीत सुरुवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहीर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लॉकडाऊन हा 24 मार्च ते 31 मेपर्यंत सुरू राहिला. काही प्रमाणात मे महिन्यात व नंतर जून महिन्यात उद्योग, व्यवसाय व व्यापाराची गाडी स्थळावर येते ना येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली महापालिकेमार्फत 3 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला. लॉकडाऊनमध्ये दुकाने पूर्णपणे बंद असल्यामुळे उद्योजकांना व्यापार्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
सध्यस्थितीत 1 ऑगस्टपासून लॉकडाऊनचे नियम जाहीर करताना दररोज सम-विषम तारखेप्रमाणे छोट्या-मोठ्या व्यापार्यांची दुकाने सुरू ठेवलेली आहेत, परंतु पनवेलमधील डी-मार्ट तसेच सुपर/मिनी मार्केटमधील व्यवहार लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून दररोज सुरळीतपणे सुरू आहेत व यासंदर्भात आपणांस यापूर्वीही व्हिडीओ क्लिप व्हॉट्सअॅपद्वारे पाठविलेली आहे. ज्याप्रमाणे डी-मार्ट व सुपर/मिनी मार्केट सुरू आहेत त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महापालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांनादेखील दररोज व्यवहार करण्याची परवानगी मिळावी अशी संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यापार्यांची मागणी असून, ही मागणी अमान्य केल्यास व्यापार्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.
व्यापार्यांची मागणी रास्त असून, नियमांचे पालन करून ते आपला व्यवसाय दैनंदिन सुरू करीत असतील तर महापालिकेने परवानगी देणे गरजेचे आहे असे निवेदनात अधोरेखित करून महापालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या व्यापार्यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. यावर ठोस कार्यवाही होणार नसेल तर व्यापार्यांच्या आंदोलनाला पनवेल शहर भारतीय जनता पक्ष पाठिंबा देईल, असेही आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.