Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालय मनपाकडून जिल्हा कोविड रुग्णालयाकरिता अधिग्रहित

अलिबाग : जिमाका – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये पनवेल उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा कोविड रुग्णालयकरिता पनवेल महानगरपालिकेकडून अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची बैठक पनवेल महानगरपालिका येथे आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

या वेळी पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. रसाळ, प्रांताधिकारी दत्तू नवले, तहसिलदार अमित सानप, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले, पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. इटकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल नखाते यांची उपस्थिती होती.

या बैठकीत महापालिका आयुक्त देशमुख यांनी या रुग्णालयासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री, मनुष्यबळ, इतर अनुषंगिक बाबींविषयीचा आढावा घेतला व त्याबाबींच्या पूर्ततेसाठी संबंधितांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे त्वरित प्रस्ताव पाठवून त्याची पूर्तता करुन घ्यावी, अशा सूचना दिल्या.

हे 120 खाटांचे रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. पूर्णतः विलगीकरण कक्ष असलेले हे रुग्णालय सर्वतोपरी सुसज्ज ठेवण्यासाठी आले आहे.

पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे नव्याने स्थापित करण्यात आलेल्या या कोरोना कोविड-19 रुग्णालयाची जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच पाहणी केली होती. या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणार्‍या रुग्णांना तपासणीसाठी व प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्रांमध्ये तर प्रसूतीसाठी दाखल होणार्‍या महिलांना कळंबोली येथील एमजीएम हॉस्पीटलात पाठविले जाणार आहे.  याकरिता एमजीएम रुग्णालयाचे मुख्य ट्रस्टी सुधीर कदम आणि या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सलगोत्रा यांच्याशीही चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply