Breaking News

कर्जतमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

एकास अटक; 17 वाघनखे, चार दात जप्त

कडाव, कर्जत ः प्रतिनिधी/बातमीदार – जगात कोरोनाची महामारी पसरली असताना त्यातून मार्ग काढून नागरिकांना वाचवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले असताना कर्जतमध्ये मात्र एका इसमाने चक्क बिबट्याची 17 वाघनखे व चार दात काढल्याचे कृत्य वन विभागाच्या जंगल गस्तीदरम्यान समोर आले आहे. वन विभागाने अत्यंत कमी कालावधीत मोठी कारवाई करीत आरोपीला गुरुवारी (दि. 2) रात्री आठ वाजता अटक केली.

आरोपीविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत  कलम 9, 39, 48, 50, 51 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी खांडस यांच्यामार्फत मृत बिबट्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असून फॉरेन्सिक लॅबमध्ये काही नमुने पुढील तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. कर्जतमधील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील मालेगाव येथील जंगल परिसरात वन विभागाचे कर्मचारी जंगल गस्तसाठी गेले असता एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर वन विभागाने वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नियुक्त करून आजूबाजूच्या गावांमध्ये काही गुप्तहेरांच्या माध्यमातून चौकशी केली असता मालेगावमधील एका इसमाची कुणकुण लागली.

त्यानंतर वन विभागाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या अधिकाराचा पुरेपूर कस लावताच आरोपीने 17 वाघनखे आणि चार दात काढल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचा शेळीपालनाचा स्वतंत्र व्यवसाय असून या कारवाईत आरोपीसह अन्य साथीदार असल्याची शंका वन विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

अलिबाग येथील उप वनसंरक्षक मनीष कुमार, किरण जगताप, पनवेल येथील सहाय्यक वनसंरक्षक नंदकिशोर कुप्टे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत वन परिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचारी यांनी ही धाडसी कारवाई केली.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply