Breaking News

खालापूर अद्याप कोरोनामुक्त; प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी

खोपोली ः बातमीदार – मुंबई-पुणे दोन महानगराच्या मध्यावर आणि नवी मुंबईला खेटून असलेला खालापूर तालुका सुदैवाने अद्याप कोरोनामुक्त असून 58 जण होम क्वारंटाइन, तर स्थलांतरित होऊन खालापुरात आलेल्या 91 जणांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवून असल्याची माहिती खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, आंतरराष्ट्रीय थीम पार्क, एन. डी. स्टुडिओ, धार्मिक स्थळे तसेच तीनशेपेक्षा जास्त कारखाने यामुळे कोरोनाचे सावट खालापूर तालुक्यावर होते, परंतु योग्य वेळी प्रशासनाने घेतलेला जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या निर्णयामुळे खालापूर तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, मात्र मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातून स्थलांतरित पायी गावी निघालेले मजूर कुटुंब खालापूर प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहेत. जवळपास अशा 91 जणांना खोपोलीतील जनता विद्यालयात स्थानबद्ध करण्यात आले असून त्यांची नियमित तपासणी आणि खाण्यापिण्याची सोय प्रशासनाने केल्याची

माहिती तहसीलदार चप्पलवार यांनी दिली.

विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. आवाहन करूनदेखील घराबाहेर पडणार्‍यांवर नाकाबंदीदरम्यान कारवाई करून गाड्या जप्त करण्यात येत आहेत. खालापुरातील मुख्य मार्गावर पोलीस ठाण्यासमोर कोरोना हटावचा संदेश तसेच विनाकारण बाहेर पडू नका, असा संदेश रस्त्यावर रेखाटण्यात आला आहे.

परदेशातून, परराज्यातून किंवा जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. पायपीट करीत येणार्‍यांना मुंबई, ठाणे, पनवेल येथे अडविण्याची गरज आहे. खालापूरवर त्याचा भार पडत आहे. मोफत अन्नधान्य देण्याबाबतदेखील सूचना प्राप्त झाल्या आहेत.

-इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणाची आबाळ होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असून खालापूर नगर पंचायतीने हद्दीतील सात वाड्यांमध्ये सर्व्हे केला आहे. 491 कुटुंबांतील 1890 जणांना धान्य तसेच दैनंदिन गरजेचे सामान वाटप करण्यात येणार आहे.

-शिवानी जंगम,  उपनगराध्यक्ष, खालापूर नगरपंचायत

प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे 15 टक्के निधीचा ग्रामपंचायतीने वापर करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. सावरोली ग्रामपंचायतीने तसा उपक्रमदेखील राबविला असून इतर ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत.

-संजय भोये, वरिष्ठ गटविकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply